औरंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना -भाजप या दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी आत्तापासूनच लॉबिंग सुरू केले आहे. जो पक्ष तिकीट देईल त्याचे काम करायचे, असा पवित्रा या उमेदवारांनी घेतल्याने या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील दोन दिवस शहरात होते. यावेळी अनेक इच्छुकांनी थेट दादांकडे तिकिटाचे साकडे घातल्याचे बोलले जाते. शिवसेनेने शहरातील सर्वच्या सर्व 115 वार्डाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यातही असंख्य इच्छुक भाजपच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन-तीन दशकांपासून शिवसेनेची मनपावर सत्ता आहे. तर गेल्या दहावर्षांपासून भाजपही सत्तेत सहभागी झाला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे दोन्ही मित्रपक्ष वेगळे झाले. आता सत्तेची समीकरणे बदलली आहेत. मनपा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशावेळी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या इच्छुकांनी भाजपकडे सेटिंग लावणे सुरू केले असून सेनेकडून तिकीट मिळाले नाही तर भाजपकडून लढायचे असा उघड पवित्रा काहीजणांनी घेतल्याचे समजते. भाजपकडे ही इच्छुकांची मोठी रांग आहे. यातील काही जण शिवसेनेच्या संपर्कात आहेत. भाजपकडून नकार मिळाला तर ऐनवेळी सेनेत जाण्याची सोय या कार्यकर्त्यांनी करून ठेवली आहे.
निष्ठावंत बोलू लागले !
वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना आता कंठ फुटू लागला आहे. पक्षातील घराणेशाही आणि उमेदवार यांच्या निवडीवर कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. एकाच घरात किती तिकीट द्यायची, तेच उमेदवार का निवडतात ? असा सवालच काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केल्याचे समजते. शिवसेनेतही जुन्या शिवसैनिकांनी पक्षाकडे न्याय देण्याची मागणी केली. तर भाजपमध्येही जुने आता समोर येऊन बोलू लागले आहेत. त्यामुळे नेत्यांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली यात शंका नाही.